पुणे, 06 ऑक्टोबर : आपण अनेकदा दिव्यांग व्यक्ती बद्दल हळहळ व्यक्त करतो. मात्र, त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि अशा लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे असे लोक खूपच कमी असतात. त्यापैकीच एक डॉक्टर सोनम कापसे या आहेत. सोनम यांनी दिव्यांग व्यक्तींसाठी रोजगार उपलब्ध करून द्यायचे चांगले कार्य सुरू केले आहे. त्यांनी एक वर्षापूर्वी पुण्यातील फर्ग्युसन रोडवर टेरासीन नावाचे हॉटेल सुरु केले असून या हॉटेलमध्ये काम करणारा सर्व स्टाफ हा मूकबधिर आहे.
अशी झाली हॉटेलला सुरुवात
राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विविध पातळीवरती दिव्यांग आणि दुर्लक्षित घटकांसाठी काम करण्याचे विविध रिसर्च पेपर्स माझे सादर झालेले आहेत. या वरती माझा विशेष अभ्यास असून मी टाटा इस्टिट्यूटमध्ये देखील काम केलेले आहे. मी तीन वर्ष दिव्यांग व्यक्तींवरती अभ्यास केला आणि त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यावा यासाठी प्रयत्न केला. याची सुरुवात म्हणून एक वर्षापूर्वी फर्ग्युसन रोडवरती टेरासीन हॉटेल सुरू केली आणि मूकबधिर व्यक्तींना रोजगार उपलब्ध करून दिला, असं डॉक्टर सोनम कापसे या सांगतात.
टेरासीन हॉटेल चालवतचं डॉक्टर सोनम कापसे सध्या शेतकऱ्यांच्यासाठी विशेष काम करत आहे. यामध्ये भारतीय धान्ये जसे की नाचणी, राजगिरावर रिसर्च करून त्यातून विविध पद्धतींचे पदार्थाची निर्मिती करणे आणि यातून देखील शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करणे यावर त्यांचे सध्या कार्य सुरू आहे.
सांकेतिक भाषेचा होतो ऑर्डर देण्यासाठी वापर
टेरासीन हॉटेलमध्ये सात ते आठ मूकबधिर कर्मचारी काम करतात. सकाळी दहा ते रात्री बारा वाजेपर्यंत हॉटेल सुरू असते आणि विविध पातळीवरती हॉटेलचे काम चालते. या हॉटेलच्या मेन्यूमध्ये खाद्यपदार्थ्यांच्या पुढे काही सांकेतिक भाषेची चित्रे दिली आहेत. हि चित्रे पाहून ग्राहक येथील कर्मचाऱ्याला ऑर्डर देऊ शकतात. त्यानंतर हे कर्मचारी ऑर्डर लिहून घेतात आणि त्याप्रमाणे ऑर्डर तयार करतात. अगदी सुटसुटीतपणे ही ऑर्डर कुणीही देऊ शकेल अशा पद्धतीने हा मेन्यूकार्ड या ठिकाणी तयार करण्यात आला आहे.
गुगल मॅपवरून साभार
टेरासीन हॉटेलचा पत्ता
सले हाइट्स, टेरासिन - 10 तुकाराम पादुका चौक, फर्ग्युसन कॉलेज आरडी, पुणे, महाराष्ट्र 411005